पाटणा : मधुर भांडारकर यांचा 'ट्राफिक सिग्नल' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर त्यात असणारे श्रीमंत भिकारी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण, चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात नसतात असा आपला समज असतो. पण, आता आम्ही तुम्हाला एका अशा भिकाऱ्याविषयी सांगणार आहोत जो खरोखर करोडपती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट आहे पाटण्यातील पप्पू कुमार या शरीराने अपंग असलेल्या भिकाऱ्याची. पप्पूचे बँकेत एक दोन नव्हे तर तब्बल चार अकाऊंट आहेत. एके काळी इंजिनिअर होण्याची इच्छा बाळगणारा पप्पू सध्या भीक मागतो. पाटणा रेल्वे स्थानकातील भिकारी हटवण्याच्या मोहिमेला रेल्वे पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा हे सत्य पोलिसांसमोर आले. पोलिसांना त्याच्याकडे चार एटीएम कार्ड आणि १० लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे.


माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार पप्पूने पोलिसांना काही धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पप्पूने त्या भागातील व्यापाऱ्यांना थोडेथोडके नव्हे तर तब्बल १० लाखांचे कर्ज व्याजाने दिले आहे.


हे समजल्यावर पोलिसांनी त्याला त्याच्या लुळ्या पडलेल्या हातावर वैद्यकीय उपचार का घेत नाहीस असा प्रश्न विचारला. यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलिसांना धक्काच बसला. 'माझा हात बरा झाला तर मला कोण भीक देईल,' असा उलट प्रश्न त्याने पोलिसांना केला.


सध्या त्याच्या नावावर २००० स्क्वेअर फूटाची जमीन आहे आणि त्याच्या बँकेच्या खात्यात पाच लाखांची रक्कम आहे. असं असलं तरी भीक मागणे सोडण्याचा त्याचा कोणताही इरादा नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.