काँग्रेससोबत आघाडी कायम, जनतेचा कौल मान्य : अखिलेश यादव
उत्तर प्रदेशमध्ये यापुढे काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवली जाईल, असे स्पष्ट संकेत मावळते मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी दिले.
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये यापुढे काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवली जाईल, असे स्पष्ट संकेत मावळते मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी दिले. दरम्यान, अखिलेश यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.
आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. पाच वर्षांत उत्तर प्रदेशला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. विकासाचा प्रयत्न केला. उत्तरप्रदेशमधील जनतेला एक्सप्रेस वे न आवडल्याने मतदारांनी बुलेट ट्रेनला मतदान केले. पण आम्हाला उत्तरप्रदेशमधील जनतेचा कौल मान्य आहे. लोकशाहीत कधीकधी समजावून नाही तर भूलथापा देऊन मते मिळवता येतात असा टोला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपला लगावला आहे.
मायावती यांनी मतदान यंत्रातील घोटाळ्याविषयी तक्रार केली असेल तर सरकारने या आरोपांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
आम्ही शेतक-यांचे १६०० कोटीचे कर्ज माफ केले होते. आता भाजप सत्तेवर येताच शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरोडे, चोरी यात कोणते राज्य आघाडीवर हे भाजपने जाहीर केले पाहिजे. आता नोटाबंदीतून बाहेर आलेला किती पैसा गरिबांपर्यंत पोहोचतो याकडे माझे लक्ष असल्याचे ते म्हणालेत.