लखनऊ : हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्नाव जिल्ह्यातील कुर्मापूर गावात ही घटना घडलीये. उन्नावमधील खुल्ताह येथील शिव कुमाप(२५) याचा विवाह जवळच्या गावातील कामिनी(नाव बदललेले) हिच्याशी ठरवले होते.


लग्नाची सर्व जय्यत तयारी झाली होती. फटाक्यांच्या आतिषबाजीत वरात घरापर्यंत पोहोचली. त्यांचेही वधूच्या घरातील व्यक्तींनी स्वागत केले. यावेळी पाहुण्यांना कोल्ड्रिंक्स, तसेच कॉफी आणि खाण्याचे पदार्थ देण्यात आले. 


वरात येण्यास उशिर झाल्याने वराच्या वडिलांनी जेवणाचा कार्यक्रम तसेच द्वारचार हे कार्यक्रम लवकरात लवकर आटोपले जावे अशी माहणी केली. जेवणही सुरु झाली होती. यावेळी अचानक पंक्तीमध्ये वाद सुरु झाला. वधूचे नातेवाईक आणि वराचे भाऊ यांच्यात वादावादी सुरु झाली. जेवणाऱ्यांना प्रत्येकी एक रसगुल्ला ठेवण्यात आला होता. मात्र वराच्या भावाने एक अधिक रसगुल्ला वाढला. यामुळे त्यांच्यात वाद सुरु झाला. 


हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही पक्षातील नातेवाईकांमध्ये हाणामारी सुरु झाली. अखेर पोलिसांना हा वाद शमवण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र ऐन लग्नात झालेला हा तमाशा पाहून वधूने लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. एक रसगुल्ला अधिक घेतल्याच्या रागातून झालेल्या हाणामारीत वधूच्या वडिलांनाही मारहाण झाली होती. त्यामुळे वधूने लग्न करण्यासच नकार दिला.