वरुण गांधी `हनी ट्रॅप`मध्ये अडकल्याचा खळबळजनक आरोप
भाजपचे खासदार वरुण गांधींनी हनी ट्रॅपमध्ये अडकून संरक्षण क्षेत्राबाबतची गोपनीय माहिती दिल्याचा गंभीर आरोप होत आहे.
नवी दिल्ली : भाजपचे खासदार वरुण गांधींनी हनी ट्रॅपमध्ये अडकून संरक्षण क्षेत्राबाबतची गोपनीय माहिती दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. शस्त्रांची विक्री करणारा मध्यस्त अभिषेक वर्मानं वरुण गांधींना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा दावा करण्यात येत आहे. वरुण गांधींनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
स्वराज अभियानचे प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकन वकील एडमोंड्स ऍलन यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला आहे. वरुण गांधी हनी ट्रॅपमध्ये अडकले आणि त्यांनी गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप मोदींना लिहिलेल्या या पत्रात करण्यात आला आहे. व्यवसायामध्ये पार्टनर असलेले ऍलन आणि वर्मा 2012मध्ये वेगळे झाले. 2006च्या वॉर रुम लीक केसमध्ये वर्माविरोधात खटला सुरु आहे.
वरुण गांधींनी फेटाळले आरोप
दरम्यान वरुण गांधींनी त्यांच्यावर झालेले हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 2004नंतर मी अभिषेक वर्माला भेटलो नसल्याचं वरुण गांधी म्हणाले आहेत. मी 22 वर्षांचा असताना लंडनमध्ये शिकत होतो, तेव्हा माझी आणि वर्माची भेट झाल्याची प्रतिक्रिया वरुण गांधींनी दिली आहे.
प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकण्याचा विचार करत असल्याचंही वरुण गांधी म्हणाले आहेत. प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कुठेही मी गोपनीय माहिती दिल्याचा पुरावा नाही अशी प्रतिक्रिया वरुण गांधींनी दिली आहे.
वरुण गांधी हे संसदेच्या संरक्षण समितीमध्ये होते. या समितीमध्ये असणाऱ्या कोणत्याही खासदाराला 0.1 टक्का गोपनीय माहितीही सांगितली जात नाही, असा दावाही वरुण गांधींनी केला आहे.