चंदीगढ : पंजाबचे नवनिर्वाचित मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील सहभागाबाबतचा संभ्रम अधिकच वाढत चाललाय. जर कायद्यात बसत असेल तर नवज्योत सिंग सिद्धूंना कॉमेडी शोमध्ये सहभागी होण्यास माझा कधीच विरोध नसेल, असं मत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, सिद्धू सांस्कृतिक मंत्री असल्याने ते जर शोमध्ये काम करत असतील तर त्यांचे खाते मात्र बदलावे लागेल असेही ते पुढे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे पंजाबचे अॅडव्होकेट जनरल यांनी मात्र सिद्धू यांच्या शोमधील उपस्थितीला विरोध दर्शवलाय. 'एका मंत्रीपदावर असताना  त्यांनी टीव्ही शो करणं योग्य वाटत नाही. ते हा शो करू शकत नाहीत. सिंद्धू यांना सांस्कृतिक मंत्रीपद दिलं गेलं आहे. हे खातं आणि मनोरंजन हे परस्पर-संबंधित असल्याने हा संघर्ष निर्माण होतोय. त्यामुळे एकतर मंत्रीपद किंवा तो शो यापैकी एका गोष्टीचा त्याग त्यांना करावा लागणार, असे पुढे जनरल म्हणाले. 


दरम्यान अॅटॉर्नी जनरलच्या मते, 'एखाद्याच्या व्यवसायावरून त्याला मंत्रीपदावरून बेदखल करण्याची कोणतीच तरतुद संविधानात नाही. मात्र एक मंत्री म्हणून काही नैतिक जबाबदाऱ्या असतात. त्या सांभाळण्यासाठी त्याला स्वत:चा व्यवसाय काहीसा दूर ठेवावाच लागतो.'


काही अंतर्गत वादामुळे सुनिल ग्रोव्हर, चंदन आणि अली अझगर यांनी शो सोडल्यामुळे आधीच कपिल अडचणीत आहे. त्यात सिध्दू यांनाही शो नाईलाजाने शो सोडावा लागल्यास कपिल शर्माच्या त्रासात वाढ होण्याची चिन्ह दिसताहेत.