चेन्नई : चेन्नई महानगरपालिकेने आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वेळेत येतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वात चलती असलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचा  निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा करणार व्हॉट्सअॅपचा वापर 


या निर्णयानुसार विभागीय आरोग्य अधिकारी आपापल्या विभागातील कोणत्याही २ आरोग्य केंद्र अथवा हॉस्पिटलचा दौरा करुन सकाळी ८ ते ८.३० दरम्यान तिथे उपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे फोटो घेऊन पालिकेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकणार आहेत. या व्यवस्थेमुळे डॉक्टर आणि कर्मचारी वेळेत येऊ लागतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.


अनेकांनी चेन्नई पालिकेच्या आरोग्य केंद्र आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तसेच अन्य कर्मचारी अनेकदा गैरहजर असतात किंवा उशिरा येतात अशा स्वरुपाची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने ही नवी व्यवस्था केली आहे. 


चेन्नई शहरात पालिकेच्यावतीने १४० प्राथमिक आरोग्य केंद्र चालवली जातात. या केंद्रांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत डॉक्टर, नर्स, फार्मसिस्ट आदी कर्मचारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज किमान १५० रुग्णांवर उपचार केले जातात. या ठिकाणी कर्मचारी वेळेवर आले नाही तर रुग्णांची मोठी गैरसोय होते. या बाबींची दखल घेऊन पालिका प्रशासनाने व्हॉट्सअॅपचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.


पालिका प्रशासन सर्व आरोग्य केंद्रांच्या हजेरीपटाची तसेच व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फोटोंची नियमित पडताळणी करुन कर्मचारी वेळेवर कामावर येतात की नाही, याची तपासणी करणार आहे. नव्या व्यवस्थेमुळे हजेरीपटात बदल करणे किंवा आयत्यावेळी सुटी घेणे अथवा उशिरा येणे या सारखे प्रकार थांबवणे शक्य होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.


चेन्नई पालिकेने व्हॉट्सअॅपचा उपयोग सफाई कर्मचारी, रस्ते बांधणी विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आधीपासूनच सुरू केला आहे. या योजनेचा फायदा दिसून आल्यामुळेच आता आरोग्य विभागातही व्हॉट्सअॅपची मदत घेण्याचा निर्णय झाला आहे.