`बलात्कारावेळी सर्वाधिक आनंद कोणी दिला?`
गँगरेप झालेल्या महिलेला बलात्कारावेळी सर्वात जास्त आनंद कोणी दिला असा संतापजनक सवाल तपास अधिकाऱ्यानं विचारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे.
तिरुवनंतपूरम : गँगरेप झालेल्या महिलेला बलात्कारावेळी सर्वात जास्त आनंद कोणी दिला असा संतापजनक सवाल तपास अधिकाऱ्यानं विचारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. या प्रश्नानंतर महिलेनं बलात्काराची तक्रारही मागे घेतली. केरळमध्ये या पीडित महिलेवर तिच्याच नवऱ्याच्या मित्रांनी गँगरेप केला होता.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या या घटनेबाबत दक्षिण भारतातली डबिंग आर्टिस्ट भाग्यलक्ष्मीनं फेसबूक पोस्ट केली आहे. ही पीडित महिला आणि तिच्या नवऱ्याला मी भेटले होते, तेव्हा त्यांनी मला हा सगळा प्रकार सांगितल्याचं भाग्यलक्ष्मी म्हणाली आहे.
सीपीएमचे कार्यकर्ते जयंदन, बिनेश, जिनेश आणि शिभू यांच्यावर बलात्काराचा आरोप असल्याचं वृत्त मल्याळम मनोरमा या वृत्तपत्रानं दिलं आहे. याप्रकरणी सीपीएम कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन सीपीएमनं दिलं आहे.
पोलीस आणि राजकारण्यांनी आमच्यावर दबाव टाकला. बलात्काराबाबत कुठेही बोललात तर मुलाची हत्या करू अशी धमकी देण्यात आली, असे खळबळजनक आरोप ही पीडित महिला आणि तिच्या पतीनं पत्रकार परिषदेमध्ये केले आहेत. मॅजिस्ट्रेटनं दबावाबाबत विचारलं असता मी त्यांच्यासमोर रडल्याचा दावाही महिलेनं केला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्यांना याबाबत अधिक माहिती देईन, असं ही पीडित महिला म्हणाली आहे.