चंदीगढ : नवज्योत सिंग सिद्धू यांनी कॉमेडी शो मध्ये सेलिब्रिटी-जज म्हणून राहावं की नाही, याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग कायदेशीर सल्ला घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या मंत्र्याने अशा कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत संविधान काय म्हणतं हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही विधीज्ञाची मदत घ्यायचं ठरवलं आहे. त्यानंतर अॅडवोकेट जनरल जे सांगतील त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवल्या जातील, असं  अमरिंदर सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. 


त्यांचा सल्ला मिळाल्यानंतर मी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी बोलेन. टीव्ही शो करण्यामुळे इतर जबाबदाऱ्यांवर दुर्लक्ष होणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रीपदाची कामं ही त्यांची पहिली जबाबदारी असणार आहे, असंही सिद्धूंना बजावण्यात आलंय. 


याबाबत स्पष्टीकरण देताना सिद्धू यांनी 'माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यासारखं आपला रेती किंवा दारुचा व्यवसाय नाही, असा टोमणा हाणलाय. हा टीव्ही शो हा आपल्या उपजिविकेचं माध्यम असल्याचं त्यांनी म्हटलंय. सोमवार ते गुरुवार मी चंदीगढमध्ये असतो तर शुक्रवार ते रविवार अमृतसरमध्ये असतो. तसंच रात्री मी काय करायचं, हा पूर्णत: माझा प्रश्न आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 


त्यामुळे, यापुढेही कपिलच्या 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात ते दिसतच राहतील आणि आपल्या शेरो-शायरीसाठी आपल्याला ठोको ताली म्हणतील, असं दिसतंय.