लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर 'योगी अॅक्शन' सुरु झालं आहे. प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आहे. प्रदेशात योगींनी अनेक आदेश दिले आहेत. ज्यामध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्याचा मोठा निर्णय देखील आहे. सचिवालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये पान-मसाले आणि प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. आतापर्यंत 300 हून अधिक कत्तलखाने सील करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी सरकारच्या आदेशानंतर राज्यातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून लखनऊ पासून हाथरसपर्यंत आणि मऊपासून गोरखपूरपर्यंत पोलीस रस्त्यावर मटन आणि मासे विकणाऱ्यांना हटवण्याचं काम करत आहे. गाजियाबादमध्ये २० हून अधिक कत्तलखाने बंद केले गेले आहेत. कत्तलखान्यामध्ये काम करणारे लोकं पर्यायी काम उपलब्ध करुन देण्याची किंवा कत्तलखान्यांसाठी परवाना देण्याची मागणी करत आहेत.


१०० पेक्षा अधिक पोलीस निलंबित


योगी सरकार बनल्यानंतर आतापर्यंत १०० हून अधिक पोलीस निलंबित झाले आहेत. गाजियाबाद, मेरठ आणि नोएडामधील निलंबित पोलिसांची संख्या अधिक आहे.


महिलांच्या सुरक्षेवर भर


लखनऊ, बुलंदशहर, मेरठ, मिर्जापूर आणि रायबरेलीमध्ये यासारख्या शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी स्क्वॉड तयार करण्यात आले आहेत.  सार्वजनिक ठिकाणी दारुचं सेवन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अनेक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली गेली.


गुरुवारी अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजधानी लखनऊमधील हजरतगंज कोतवालीला पोहोचले. तेथे त्यांनी पीडिताच्या मूलभूत समस्या आणि पोलीस विभागाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली.