कोलकाता : अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझे बाबा खूप वाईट आहेत. ते माझ्या आईला दररोज मारहाण करतात. आई आणि मी प्रत्येक रात्र रडत काढतो' असं या चिमुरडीनं आपल्या निबंधात लिहिलंय. 'आमची कुणालाही काळजी नाही. आमच्या नातेवाईकांनीही आमच्याकड़े दुर्लक्ष केलंय. बाबा कधी कधी मलाही मारहाण करतात... असं माझं कुटुंब आहे' कोलकातामधल्या एका इंग्रजी माध्यमात इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या चिमुरडीचे हे शब्द... 


मी जेव्हा मोठी होईन तेव्हा मी आईला घेऊन बाबांपासून दूर निघून जाईन, असंदेखील तिनं आपल्या निबंधात लिहिलंय. 


शिक्षकही हादरले


हा निबंध वाचल्यानंतर या चिमुरडीचे शिक्षकही हादरले. तात्काळ त्यांनी प्राध्यापक आणि शाळेच्या काऊन्सलरांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर शाळेनं या मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं... मुलगी आपल्या वडिलांबद्दल काय विचार करते, हेही त्यांनी पालकांना समजावून सांगितलं... आणि पती-पत्नीला वेगळं राहण्याचा सल्लाही दिला. 


आपल्या मनातल्या गोष्टी कागदावर उतरवा 


आपल्या आयुष्यात अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रालादेखील सांगू शकत नाहीत. पण, शाळेच्या मोकळ्या वातावरणात ही मुलगी कागदावर तरी आपल्या मनातलं उमटवू शकली... लिखाणं हा आपलं मन मोकळं करण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.