मुंबई : एका चिमुरडीच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बाना अलाबेद असं तिचं नाव. सध्या ट्विटरवर ही चिमुरडी प्रसिद्ध आहे. तिचं वय वर्ष अवघं सात. पण तिचे अवघ्या दोन महिन्यांत तब्बल 90 हजार फॉलोअर्स झालेत. ही चिमुरडी रोज ट्विटरवरुन सीरियातल्या युद्धाच्या गोष्टी सांगतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाना अलाबेद..
या सात वर्षांच्या चिमुरडीनं सगळ्या जगाचं लक्ष सीरियाकडे वळवलंय. सीरिया गेल्या काही वर्षांपासून धुमसतंय.... पण या युद्धामुळे सीरियामधल्या मुलांचं बालपण कुस्करलं गेलंय..... हरवलेल्या या बालपणाची गोष्ट बाना तिच्या ट्विटसमधून सगळ्या जगाला सांगतेय.... सीरियामधल्या अलेप्पो शहरात बानाचं घर आहे.... एकेकाळी अलेप्पो ही सीरियाची आर्थिक राजधानी होती.... आता मात्र विध्वंसाच्या खुणा मिरवत हे शहर उभं आहे.... बाना अजून जिवंत आहे... म्हणून ती ट्विट करु शकतेय.....@AlabedBana हा ट्विटर अकाऊण्ट 24 सप्टेंबरला ओपन करण्यात आला... आणि सात वर्षाच्या बानाचं पहिलंच ट्विट होतं 'I need peace'.... त्यानंतर जवळपास दोन महिने बाना ट्विटरवरुन रोज सीरियातल्या युद्धाची माहिती देतेय... 
तिच्या शब्दांत..... 
ते रोज बॉम्ब का टाकतात ?
आमच्यासारख्या निरागस मुलांना त्यांना का मारायचंय ?
मी जिवंत आहे
इकडे माणसं माशांसारखी मरतायत
पाऊस पडावा तसे बॉम्ब पडतायत



बानाच्या या ट्विटसनी सीरियातली भयाण परिस्थिती जगासमोर आलीय. दोन महिन्यात बानाचे 88 हजार ट्विटर फॉलोअर्स झालेत. बानाच्या मैत्रिणीचं धर बॉम्ब हल्ल्यात उध्वस्त झालं आणि त्या हल्ल्यात तिच्या मैत्रिणीचाही मृत्यू झाला. बानानं त्या घराचा फोटो ट्विटरवर शेअर केला. ट्विटरच्या हायलाईट सेक्शनमध्ये दोन दिवसांपूर्वीच हा फोटो हायलाईट करण्यात आला..... आज   बानानं अपलोड केलेला हा नवा व्हिडीओ..... अलेप्पोची आजची स्थिती दाखवणारा...... भग्न आणि छिन्न विछिन्न झालेल्या शहरातून शांततेसाठी पाठिंबा मागणारी ही छोटीशी बाना आशेचा नवा किरण दाखवत इथल्या रस्त्यांवर फिरतेय... 


 


पण बानाच्या आधीही सीरीयातली भीषण परिस्थिती दाखवणारा एक निरागस आणि तितकाच भयानक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता... बानाच्याच अलेप्पो शहरात राहणा-या  ओमरान डॅकनीशचा. हा फोटो होता. पाच वर्षांचा ओम्रान सीरियात झालेल्या बॉ़म्ब हल्ल्यांमध्ये जखमी झाला होता... ऑगस्टमध्ये अलेप्पोमध्ये झालेल्या बॉ़म्ब हल्ल्यात ओम्रान आणि त्याचे तीन भाऊ वाचले. पण ओम्रानच्या मोठ्या भावाचा आणि आणखी पाच लहान मुलांचा यामध्ये मृत्यू झाला होता.... ओम्रानच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सीरियातल्या परिस्थितीची धग जगाला जाणवली होती.... 
ओम्रानच्या आधी ही दाहकता जगासमोर आली ती सीरियामधल्याच अलान कुर्दीच्या फोटोमधून.... तीन वर्षांचा अलान कुर्दी आणि त्याचे कुटुंबीय सीरियातल्या युद्धाला वैतागून सीरिया सोडून युरोपात जात होते... त्यावेळी अलान भूमध्य समुद्रात बुडाला.... त्याच्या या फोटोनं जगभरात खळबळ उडवून दिली होती.... जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांना फोन करुन रेफ्युजीज म्हणजेच निर्वासितांच्या मुद्द्यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज व्यक्त केली होती.


अलान, ओम्रान आणि बाना यांच्या या काही प्रातिनिधीक युद्ध कथा..... एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या या राज्यकर्त्यांच्या खेळात अशी किती निरागस आयुष्य बॉम्बच्या हल्ल्यात आणि बंदुकीच्या गोळ्यांमध्ये टिपली गेली... किती कोवळ्या कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या गेल्या, याचा हिशोबच नाही.... दुस-या महायुद्धापासून अॅन फ्रँकच्या अशा अनेक डाय-या अजूनही लिहिल्या जातायत रक्तरंजित युद्धांच्या.... आणि त्यात कुस्करल्या गेलेल्या बालपणाच्या.


दुस-या महायुद्धात ज्यूंवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट सगळ्यात आधी सांगितली ऍन फँकनं... हिटलरपासून लपता लपता या कुटुंबाची झालेली वाहाहत अॅन फ्रँक नावाची जर्मन चिमुरडी तिच्या डायरीत लिहीत होती.... तिच्या मैत्रिणीला ती गोष्ट सांगतेय, अशा स्वरुपातली अॅनची ही डायरी होती.


सोळा वर्षांची असतानाच अॅनचा मृत्यू झाला.... त्यानंतर तिची ही डायरी सापडली... त्यातलं लिखाण हे भल्याभल्यांना थक्क करणारं होतं.... तिच्या डायरीवर डायरी ऑफ ऍन फ्रँक हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं.... आज जगभरातल्या साठ भाषांमध्ये या पुस्तकाचं भाषांतर झालंय.... अॅन फ्रँकच्या लिखाणात प्रामुख्यानं जाणवणारी एक गोष्ट म्हणजे अत्याचार होत असले तरी तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता.... अॅनचाच हा वारसा आजही मलाला, बानासारख्या मुली पुढे नेतायत.. त्यांच्या चिमुकल्या शब्दांतून शांततेचा आग्रह धरत.