कराची : पाकिस्तानमध्ये आता महिला टॅक्सी चालवणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी एका कंपनीनं हे पाऊल उचललंय. यामुळे आता पाकिस्तानमधील महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये महिलांना रोजगार मिळावा यासाठी एका कंपनीनं महिला टॅक्सी ड्रायव्हर्स नेमले आहेत. कराचीत एका मल्टीनॅशनल ट्रान्स्पोटेशन नेटवर्क कंपनीची ही योजना आहे. सुरुवातीला या कंपनीत टॅक्सीसाठी केवळ पुरुष ड्रायव्हर्सचीच भरती केली जायची. मात्र, महिलांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाव्या यासाठी त्यांनी हे पाऊल उचचलंय. 


४६ वर्षीय आसिया अझिझ यांना दोन मुली आहेत. त्या आता या कंपनीसाठी टॅक्सी चालवतात. स्वत:ची कार असली तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार टॅक्सी चालवता येणार आहे. लोकांच्या मानसिकतेत बदल व्हावा, या उद्देशानं हा प्रयत्न सुरु आहे. सुरुवातीला केवळ सातच महिला टॅक्सी चालकांची भरती केली आहे. मात्र, यासाठी अनेक अर्ज आलेत आणि त्यातून या महिला टॅक्सी चालकांची भरती करण्यात आली. मोबाईलच्या अॅपद्वारे टॅक्सी प्रवाशांना बुक करता येणार आहे. 


महिला टॅक्सी ड्रायव्हर्सना पाहूनं प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळत असल्यानं त्यांनी याचं स्वागतचं केलंय. 


पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात आता महिला रस्त्यावर टॅक्सी चालवत आहेत. मात्र, या सेवेच्या माध्यमातून निश्चितच अनेक महिला रोजगारासाठी हा पर्याय निश्चित अवलंबतील यात शंकाच नाही.