नवी दिल्ली : जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या भारत आणि चीन या दोन्ही देशांची नेहमी तुलना केली जाते. पण, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत चीन भारताच्या बऱ्याच पुढे आहे. चीन सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लष्करी खर्चाच्या आकड्यांवरुन हा अंदाज बांधणे सहज शक्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या आर्थिक वर्षात चीन सरकारने लष्करावर केल्या जाणाऱ्या खर्चात ७.६ टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या १०.१ टक्क्याच्या वाढीपेक्षा कमी असली तरी प्रत्यक्ष आकडा फार मोठा आहे.


चीनचा लष्करी खर्च... 
येत्या वर्षात चीनचे सरकार त्यांच्या लष्करावर १४६.६७ अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. भारतीय रुपयांत त्याची किंमत ९,८२,५२६ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी चीनने १३५.९६ अब्ज डॉलर्स इतका खर्च केला होता.


भारताच्या लष्करासाठी किती?
याची तुलना भारताशी केल्यास चीनचा लष्करावरील खर्च भारतापेक्षा चार पटींनी जास्त असल्याचं आपल्या लक्षात येईल. अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात भारताच्या लष्करी खर्चासाठी ३६.५ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे. भारतीय रुपयांत याची किंमत २,४४,५०९ कोटी रुपये इतकी आहे.


का केलीय इतकी भक्कम लष्करी तरतूद...
चीनचा हा भलामोठा वाटणारा आकडा मात्र अमेरिकेच्या लष्करी तरतूदीच्या केवळ २५ टक्के इतकाच आहे. चीनचे सध्या त्याच्या अनेक शेजारील राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे चीनला ही वाढ करणं अपरिहार्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.