दुस-या महायुद्धाची बातमी ब्रेक करणाऱ्या महिला पत्रकाराचे निधन
दुस-या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी सगळ्यात आधी ब्रेक करणा-या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे निधन झालंय. वयाच्या 105 व्या वर्षी हॉगकाँग इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हाँगकाँग : दुस-या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी सगळ्यात आधी ब्रेक करणा-या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे निधन झालंय. वयाच्या 105 व्या वर्षी हॉगकाँग इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऑगस्ट 1939 साली जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं त्यावेळी क्लेअर या 'द टेलिग्राफ' या ब्रिटीश वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करत होत्या. त्यांनीच ती बातमी जगापर्यंत पोहचवली होती. काही दिवसांनी 1 सप्टेंबर रोजी आपल्या दैनिकाला आणि ब्रिटीश नियतकालिकांना त्यांनी आंखों देखाँ हाल कळवला होता.
जागतिक इतिहासाला कलाटणी देणा-या या घटनेच्या वेळेस क्लेअर यांना कामावर रुजू होऊन फक्त एक आठवडा झाला होता. विशेष म्हणजे अन्य देशांसहित क्लेअर यांनी भारतातही काम केलं होतं. जर्मनी, व्हिएतनाम आणि चीनमधील बहुतेक युद्धांमध्ये त्यांनी आघाडीवर जाऊन बातमीदारी केली होती.
युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडमधील कॅटोवाईस शहरातून ब्रिटनमध्ये जाण्यासाठी त्यांनी साडेतीन हजार ज्यू नागरिकांना मदत केली होती. युद्धाच्या काही दिवस आधी त्यांनी जर्मन रणगाडे चाल करुन जाताना पाहिले होते. मात्र नवोदित पत्रकार असल्याने या युद्धाची जाणीव झाली नाही असंही क्लेअर यांनी मान्य केलं होतं.