मुंबई : दुसऱ्या महायुद्धाने करोडो माणसांच्या आयुष्यावर परिणाम केला. अनेकांची आयुष्यं, संसार आणि कुटुंब या युद्धामुळे उद्ध्वस्त झाली. त्यातलाच एक लंडनमधला रॉय विकरमॅन... त्यांचं नोरा जॅकमॅन या तरुणीशी लग्न होणार होतं. मात्र, दुसऱ्या महायुद्धाचा त्यांच्यावर असा परिणाम झाला की त्यांना आपलं लग्न मोडावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, शेवटी प्रेम खरं असलं की ते दोन जीवांना एकत्र आणतंच असं म्हणतात. असंच काहीसं रॉय आणि नोरा यांच्या बाबतीत घडलं. आता त्यांनी अखेर विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतलाय.


डिसेंबर १९४४ ते जानेवारी १९४५ च्या 'बॅटल ऑफ बल्ज' या युद्धात रॉय सहभागी झाले होते. त्या युद्धात झालेला हिंसाचार, लोकांच्या कत्तली आणि रक्तपात पाहून त्यांच्या मनावर परिणाम झाला. साखरपुडा झालेला असला तरी लग्न न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.


पण, त्यांचं खरं प्रेम त्यांना स्वस्थ बसून देत नव्हतं... दशकं उलटून जात होती... शेवटी त्यांनी एका स्थानिक रेडिओ स्टेशनची मदत घेतली. त्यांनी नोराचा शोध घेतला. तिची माफी मागण्यासाठी तिच्या घरी ते पुष्पगुच्छ घेऊन गेले.


दरम्यानच्या इतक्या मोठ्या काळात नोराचे लग्न झाले होते आणि त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले होते. त्यामुळे रॉयला पाहून नोरांना भावना आवरल्या नाहीत. त्यांनी रॉयच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर दिवसांमागून दिवस गेले आणि त्यांच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. रॉय यांच्या ९० व्या वाढदिवशी त्यांनी नोराला तीच अंगठी दिली आणि पुन्हा साखरपुडा केला.


आता, मात्र ते लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. इतक्या वर्षांच्या एका अपूर्ण नात्याला ते नवीन रुप देणार आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान उभी राहिलेली बर्लिनची भिंत ज्याप्रमाणे अनेक दशकांनी पडली, तसाच रॉय आणि नोरा यांच्यातील दुरावाही इतक्या दशकांनंतर मिटला आहे. दुरावलेल्या दोन जिवांना केवळ प्रेमाच्या ताकदीने इतक्या वर्षांनी एकत्र आणलं आहे.