गायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं
पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.
पॅरिस: पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं. फ्रान्सकडून येत असलेलं एअरबस 320 हे विमान इजिप्तच्या वेळेनुसार पहाटे अडीच वाजता भूमध्य समु्द्रातून इजिप्तच्या एअर स्पेसमध्ये शिरल्यानंतर रडारवरून नाहीसं झालं.
विमान नक्की कोणत्या कारणांमुळे कोसळलं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र दहशतवादी कृत्यामुळेच हा एअर क्रॅश झाला असावा असा अंदाज इजिप्तचे हवाई वाहतूकमंत्र्यांनी व्यक्त केलाय. विमान कोसळण्यासाठी कारण ठरतील अशी कोणतीही तांत्रिक चूक विमानात नव्हती. त्यामुळे दहशतवाद्यांनीच काही घातपात घडवून आणला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या विमानात 66 प्रवासी होते. विमानाचं शोधकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दरम्यान शोधकार्यात सहभागी असलेल्या एका ग्रीक युद्धनौकेला समुद्रात तरंगणारे काही अवशेष सापडले आहेत. पांढऱ्या आणि लाल प्लॅस्टीकचे काही भले मोठे तुकडे आणि दोन लाईफ जॅकेट्स सापडल्याचा दावा ग्रीसच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने केला आहे.
हे अवशेष विमानाचेच असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र शोधकार्य अजूनही सुरूच आहे. ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार रडारवरून दिसेनासं होण्याआधी विमानाने डावीकडे 90 अंशांचे आणि नंतर परत उजवीकडून 360 अंशांचं अनियमीत वळण घेतलं. 38 हजार फुटांवरून विमान 15 हजार फुटांपर्यंत खाली आलं आणि नंतर दिसेनासं झालं.