अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या चेहऱ्याचा हा पक्षी चर्चेचा विषय
सध्या चीनमध्ये एक पक्षी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की त्याचा चेहरा एका व्यक्तीसारखा दिसतो. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष. तर पक्ष्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कुणी साधीसुधी आसामी नाही. सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेला हा राजकीय चेहरा आहे
बीजिंग : सध्या चीनमध्ये एक पक्षी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की त्याचा चेहरा एका व्यक्तीसारखा दिसतो. आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष. तर पक्ष्यासारखी दिसणारी ही व्यक्ती कुणी साधीसुधी आसामी नाही. सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेला हा राजकीय चेहरा आहे. नेमकं काय घडलंय हे बघायला आपल्याला जावं लागेल चीनच्या हँगझेऊ शहरात.
हा आहे चीनमधल्या सफारी पार्कमधला गोल्डन फिसंट जातीचा पक्षी. डोक्यावर सोनेरी तुरा. पिसांची रंगीबेरंगी संगती. असा हा गोल्डन फीसंट अतिशय देखणा. या पाच वर्षांच्या पक्ष्याचं नाव आहे 'लिटिल रेड'. तसे इथं शेकडो पक्षी आहेत, पण सध्या हा लिटिल रेड सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र झालाय. विशेषतः अमेरिकन निवडणुकी नंतर. आता तुम्ही म्हणाल की अमेरिकन निवडणुकीचा काय संबंध ? तर हा लिटिल रेड अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा दिसतो म्हणे... चीनमधला सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचं दैनिक पिपल्स डेलीच्या वेबसाईटवर सर्वप्रथम ही साम्यस्थळं दाखवण्यात आली. मग काय. सगळ्यांनाच या गोल्डन फीसंटमध्ये ट्रम्पचा भास व्हायला लागला.
या पक्षाचा तुरा काहीसा ट्रम्प यांच्या केशरचनेसारखाच आहे. नेटिझन्सनी दिलेल्या फोटोंशी तुलना केल्यावर तर त्याच्या डोळ्यांमधले भावही समान असल्याचं दिसतंय. तुम्ही गोल्डन फीसंटच्या दिशेनं जात असाल तर त्याच्या डोळ्यांत सावध भाव येतात. ते थेट ट्रम्प यांच्यासारखेच असतात.
इतकंच नाही, तर याचं नावच ट्रम्प करावं, असं काही पक्षी निरीक्षकांना वाटत आहे. हा पक्षी फारच सुंदर आहे. मी याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले ट्रम्पच आठवले. ट्रम्प यांची केशरचना गोल्डन फीसंटवरूनच घेतली असेल, असं वाटतं. आणि या गोल्डन फीसंटचं नाव तर ट्रम्प फीसंट केलं तर तो अधिक प्रसिद्ध होईल.
गोल्डन फिसंट हा पक्षी चीनचा स्थानिक. अन्य काही देशांमध्ये त्याचे काही भाऊबंद आढळतात. आता त्याचे लुक-अलाईक डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर तो अमेरिकनांनाही आपलासा वाटतो का, अशीच चर्चा आहे.