बंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार
पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
इस्लामाबाद : पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
विवाहानंतर दोनच दिवसांनी उजमानं पाकिस्तानात भारतीय उच्चायोगात शरण घेतली होती... आणि मदतीची याचना केली होती. उजमानं पाकिस्तानस्थित भारतीय उच्चायोगात ताहिर अली या पाकिस्तानी नागरिकावर बंदुकीचा धाक दाखवून आपल्याशी निकाह केल्याचा आरोप केला होता... मॅजिस्ट्रेटसमोर तिनं आपली बाजू मांडली होती. आपले सगळे इमिग्रेशनसंबंधी कागदपत्रं जबरदस्तीनं काढून घेण्यात आल्याचंही तिनं म्हटलं होतं. व्हिजासंबंधी अर्ज करताना पाकिस्तानस्थित आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असल्याचं उजमानं म्हटलं होतं.
यानंतर इस्लामाबाद हायकोर्टानं उजमाला वाघा बॉर्डरपर्यंत सुरक्षित सोडण्याचे आदेश दिलेत. २० वर्षीय उजमा भारतीय नागरिक असून डॉक्टर आहे.
पाकिस्तान परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस जकरिया यांच्या म्हणण्यानुसार, अजूनही न्यायालयात उजमा प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून उजमा भारतात येऊ शकेल.