40 वर्षांपूर्वीचा इराण कट्टरतावादी नव्हता!
इराणमध्ये बुरख्याला नको इतकं महत्त्व आहे. कट्टरवादाचा अतिरेक सध्या या देशात सुरू आहे. पण एकेकाळी इराण असा नव्हता.
नवी दिल्ली : इराणमध्ये बुरख्याला नको इतकं महत्त्व आहे. कट्टरवादाचा अतिरेक सध्या या देशात सुरू आहे. पण एकेकाळी इराण असा नव्हता.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचा इराण एकदम वेगळा होता. इराणमध्ये कुठलीही धार्मिक बंधनं नव्हती. पण 1979 मधल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराण पूर्णपणे बदलून गेला.
बुरख्याशिवाय फोटोही नाही...
आता इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणांवर तर बुरख्याचं बंधन आहेच पण सोशल मीडियावर फोटो टाकतानाही एखाद्या महिलेला बुरखा घालूनच फोटो टाकावा लागतो. तसं केलं नाही तर तिला शिक्षा होते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना बुरखा घातला नाही, म्हणून यावर्षभरात एक डझन महिलांना इराणमध्ये अटक झालीय.
30 लाख महिलांवर कारवाई
इराणमधल्या महिला बुरखा घालण्याच्या नियमांचं पालन करतात की नाही, हे पाहण्याचं काम इराणमधले मॉरल पोलीस करतात... त्यासाठी या पोलिसांची रस्त्यावर सतत गस्त सुरू असते. त्याचबरोबर बुरखा घालण्यासाठी ठिकठिकाणी फलकही लावण्यात आलेत. बुरखा न घालणं हा तिथे गुन्हा समजला जातो. त्यासाठी दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा आहे. बुरखा न घालणाऱ्या महिलेला अगदी जन्मठेपेपर्यंतची शिक्षाही सुनावली जाते. गेल्या 8 वर्षांत बुरखा न घालणाऱ्या सुमारे 30 लाख महिलांवर कारवाई करण्यात आलीय.
पुरुषांचाही पुढाकार
पण, आता इराणच्या या जाचक नियमाविरोधात इराणमध्येच विद्रोह होतोय. महिलांवरचं बुरख्याचं बंधन हटावं, यासाठी आता पुरुषांनीही पुढाकार घेतलाय. त्यासाठी सोशल मीडियावर एक मोहीमही सुरू करण्यात आलीय. यामध्ये पुरूष स्वतःचा फोटो बुरखा घालून टाकतायत, आणि त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या महिलेनं मात्र बुरखा घातलेला नसतो. इराणचा हा जाचक नियम हटवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला कितपत आणि कधी यश येणार? याची उत्तरं सध्या तरी कुणाकडेच नाहीत.