काबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे. याबाबत माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन दिली.
काबूलमधील तैमानी येथून ज्युडिथ डिसूझा या महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या महिलेची सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे. ज्युडिथ लवकरच मायदेशात परतेल, असेही त्यांनी म्हटले आहे. ज्युडिथचे ९ जून २०१६ रोजी अपहरण करण्यात आले होते.
ज्युडिथ ही मुळची कोलकाता येथील असून ती अफगाणिस्तानातील आगाखान फाउंडेशनमध्ये काम करते. अपहरण झालेल्या ज्युडिथ डिसूजा यांची सुखरुपरित्या सुटका झाल्याचे सांगताना मला खूप आनंद होत आहे, अशा आशयाचे ट्विट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. तसेच ज्युडिथच्या सुटकेसाठी मदत करणा-या अफगाणिस्तानचेही स्वराज यांनी आभार मानलेत.