मुंबई : मंगळवारी सकाळी इजिप्तमध्ये झालेल्या विमान अपहरणाच्या बातमीने जगाचा हृदयाचा ठोका चुकवला. मात्र, आता हाती आलेल्या माहितीनुसार विमानाचे अपहरण करणारी ही व्यक्ती दहशतवादी नसून त्याने आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला भेटण्यासाठीच या विमानाचं अपहरण केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इजिप्त एअरच्या MS181 या अलेक्झांड्रिआहून कैरोला जाणाऱ्या विमानाचं अपहरण झाल्याची बातमी मंगळवारी सकाळी धडकली. त्यानंतर विमान उडवून देण्याची धमकी देत इब्राहिम समाहा या व्यक्तीने हे विमान सायप्रस देशातील लार्नाका विमानतळावर उतरवण्यास भाग पाडलं.


यानंतर झालेल्या वाटाघाटीत या व्यक्तीने आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ती सायप्रस देशात वास्तव्य करते. या वाटाघाटी दरम्यान त्याने सायप्रस देशात राजाश्रय मिळावा, अशी मागणीही केली आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्याने विमानातून बाहेर एक पत्रही फेकलं. अरबी भाषेत लिहिलेलं हे पत्र त्याच्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्याने केली आहे.


इजिप्तच्या परराष्ट्र खात्याने या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना 'ही व्यक्ती दहशतवादी नसून मूर्ख आहे,' अशा शब्दांत या घटनेचं वर्णन केलंय. या विमानातील सर्वच्या सर्व ५५ प्रवासी सुखरुप आहेत. पण, अद्याप विमानातील क्रू स्टाफ विमानातच आहे. 


एका महिलेमुळे प्रेमभंग झालेल्या या व्यक्तीनं आज मात्र जगभरातल्या अनेक काळजांची धडधड चुकवली होती. दरम्यान इब्राहिम हा अलेक्झांड्रिआ विद्यापीठात प्राध्यापक आहे.