500 कोटी पगार असूनही सोडली नोकरी
सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : सॉफ्ट बँकेचे अध्यक्ष आणि सीओओ निकेश अरोडा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण निकेश अरोडा सॉफ्ट बँकेचे सल्लागार म्हणून कायम राहणार आहेत. 48 वर्षांच्या निकेश अरोडांचा जन्म भारतामध्ये झाला होता. निकेश अरोडांनी दिलेला हा राजीनामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
निकेश अरोडांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना क्लीन चिटही देण्यात आली होती, पण तरीही त्यांच्या राजीनाम्यानं खळबळ माजली आहे. निकेश अरोडा हे जगभरातल्या सर्वात श्रीमंत कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपैकी एक आहेत.
सॉफ्ट बँकेमध्ये असताना निकेश अरोडांना 2015-2016 या आर्थिक वर्षामध्ये वर्षाला 500 कोटी रुपयांचा पगार मिळत होता. निकेश सलग दुसऱ्या वर्षी ब्लूमबर्गच्या जगभरातल्या टॉप पेड एक्झिक्युटिव्हच्या लिस्टमध्ये होते. निकेश यांचा पगार ऍपलचे सीईओ टीम कूक आणि वॉल्ट डिज्नीचे बॉब ईगर यांचा इतकाच होता. वर्षाचा बोनस पकडून निकेश यांचा पगार जवळपास 850 कोटी एवढा होता. सॉफ्टबँकमध्ये आल्यानंतर निकेश अरोडा यांनी जगभरातून बँकेत 400 कोटींची नवी गुंतवणूक आणली होती.
राजीनामा दिल्याची माहिती निकेश अरोडा यांनी ट्विटवरवरून दिली. माझ्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला, बँकेच्या स्पेशल कमिटीनं मला क्लिन चीट दिल्यानंतर मी राजीनामा दिला आहे, असं अरोडा म्हणाले आहेत.