चीन बांधणार नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग
चीन आणि नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात येणार आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनने केली आहे.
बीजिंग : चीन आणि नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात येणार आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनने केली आहे.
चीन आणि नेपाळमधील रेल्वेमार्गामुळे नेपाळचे भारतावरील अवलंबित्व कमी होणार असल्याचे मानण्यात येत आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या मोठ्या आंदोलनावेळी येथील भारतीय वंशाच्या मधेसी समुदायाने भारत आणि नेपाळमधील मार्ग रोखून धरले होते.
नेपाळमधील जनजीवन विस्कळित झाले होते. या पार्श्वभूमीवर, नेपाळ आणि चीनमधील दळणवळणाच्या मार्गांचा अधिकाधिक विकास करण्यासाठी नेपाळमधील नेतृत्व प्रयत्नशील आहे.
नेपाळमध्ये एक विमानतळ आणि या दोन्ही देशांस जोडणाऱ्या एका पुलाच्या निर्मितीसाठी चीन विशेष आग्रही आहे. ओलि हे सध्या चीनच्या सात दिवसीय दौऱ्यावर आहेत, आज या दोन देशांमध्ये दहा महत्त्वपूर्ण करार झाले.
ओलि यांचे चीनचे पंतप्रधान ली कशियांग यांनी भव्य स्वागत केले. यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही नेपाळच्या पंतप्रधानांची भेट घेतली.