इस्लामाबाद : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठिशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय. जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानातही दहशतवादी ठरवण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी हल्ल्यामध्ये स्वतःच्या नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडल्याची जाणीव झाल्यानंतर ही उपरती झालीय. हाफिज सईदला दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणून तो दहशतवादी असल्याचं पाकिस्ताननं जवळजवळ मान्य केलंय.


पाकिस्तानच्या पंजाब सरकारनं सईद आणि त्याचा साथीदार काझी काशिफला दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत टाकलंय. या यादीत अब्दुल्ला ओबैद, जाफर इकबाल, अब्दुर रहमान आबिद या तिघांची नावंही टाकण्यात आलीत.


30 जानेवारी 2017 पासून हाफिज सईद नजर कैदेत आहे. 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सईदला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. 2009 साली कोर्टानं त्याची सुटका केली होती. पाकिस्तानी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या गृह मंत्रालयानं दहशतवाद विरोधी विभागाला या लोकांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. या यादीत नाव आल्याने सईदच्या परदेशी प्रवासावर निर्बंध येऊ शकतात.