लंडन : आजच्या दिवसाचं वर्णन 'ब्रिटनचा स्वातंत्र्यदिन' असं केलं जातंय. युरोपमधल्या अन्य २७ देशांसोबत असलेला ४० वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय ब्रिटननं घेतलाय. काल झालेल्या जनमत चाचणीत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजून कौल आलाय. जागतिक अर्थकारण आणि राजकारणावर परिणाम करणारी ही घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारं हे जनमत आहे. ५१ पूर्णांक ९ टक्के विरुद्ध ४८ पूर्णांक १ टक्का अशा अतिशय किरकोळ बहुमतानं ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडत असल्याची घोषणा झालीय. १९७४ साली स्थापन झालेल्या या २८ देशांच्या संघटनेमध्ये प्रथमच फूट पडलीय. युरोपियन युनियनमध्ये राहण्याच्या बाजूनं असलेले 


पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना हा सर्वात मोठा धक्का आहे. या निकालानंतर आता ब्रिक्झिटची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी आपण योग्य नसल्याचं मान्य करत ऑक्टोबरमध्ये पायउतार होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय... आपण या जहाजात असू, पण कॅप्टन म्हणून नव्हे, असं ते म्हणालेत. ब्रिक्झिटचे खंदे समर्थक, यू.के. इंडिपेडन्स पार्टीचे नेते निगेल फॅरेज यांनी ईयूमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी, असं आवाहन केलंय. 


ब्रिक्झिटवाद्यांना घाई सुटली असली, तरी ब्रिटन तातडीनं यूकेच्या बाहेर पडेल, असं नाहीये... ही प्रक्रिया वेळखाऊ आहे...


- सगळ्यात आधी ब्रिटनच्या संसदेनं या सार्वमताला मान्यता द्यावी लागेल. 


- त्यानंतर या निर्णयाबाबत युरोपियन काऊंसिलला माहिती द्यावी लागेल. 


- मग २ वर्षांची कमाल मर्यादा असलेली विभक्तीकरणाची बोलणी सुरू करावी लागतील. 


- जोपर्यंत ही बोलणी सुरू आहेत, तोपर्यंत यूके युरोपियन युनियनचाच भाग असेल. नव्यानं होणारे कायदेही ब्रिटनला लागू असतील. 


- दोन वर्षांची मर्यादा वाढवायची असेल तर युरोपियन युनियनमधल्या सर्वच्या सर्व देशांची मंजुरी लागेल. 


- चर्चेत काही निष्पन्न झालं नाही किंवा मुदतवाढ मिळाली नाही, तर यूके कोणत्याही कराराशिवाय युरोपियन युनियनमधून बाहेर पडू शकतो.  


काय होणार परिणाम?


ब्रिटन आणि युरोपियन युनियनला ब्रिक्झिटची किती घाई आहे, त्यावर ही प्रक्रिया किती काळ चालेल ते निश्चित होईल... मात्र, विक्रमी मतदानात जनतेनं दिलेला कौल हा ब्रिटनवर आणि जगावर परिणाम करणारा ठरलाय. ब्रिटनमध्ये अन्य युरोपियन देशांचा मुक्त वावर जसा कमी होईल, तसाच ब्रिटनचाही उर्वरित युरोपमध्ये कमी होईल... युरोपियन समुदायाची एकता यामुळे संपुष्टात आलीय. आगामी काळात अन्य देश युनियनमधून बाहेर पडायची मागणी करू शकतात. नेदरलँडनं तसे संकेतही दिलेत... जागतिक अर्थकारणाची घडी आता नव्यानं बसवावी लागणार, हे मात्र निश्चित...