नरेंद्र मोदी, प्रियांका चोप्रामध्ये स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यामध्ये टाईम मॅगझिनच्या जगभरातल्या 100 प्रभावशाली व्यक्ती होण्यामध्ये स्पर्धा लागली आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यामध्ये टाईम मॅगझिनच्या जगभरातल्या 100 प्रभावशाली व्यक्ती होण्यामध्ये स्पर्धा लागली आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला आणि अमेरिकेन अभिनेता अझिझ अन्सारी हे भारतीय मूळ असलेले तिघंदेखील या स्पर्धेमध्ये आहेत.
पुढच्या महिन्यामध्ये या 127 व्यक्तींपैकी 100 प्रभावशाली व्यक्तींची घोषणा होणार आहे. लोकांनीही मतदान करून या प्रभावशाली व्यक्ती ठरवाव्यात, असं आवाहन टाईम मॅगझिननं केलं आहे.
टाईम मॅगझिनच्या या यादीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. हॅरी पॉटर सीरिजचे लेखक जे.के.राऊलिंग, फेसबूकचे सीईओ मार्क झकेरबर्ग आणि त्याची बायको प्रिस्किला चान, पोप फ्रान्सिस, म्यानमारचे लोकशाहीवादी नेते आँग सान सु कि, जर्मन चान्सलर एँजेला मर्कल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्हाल्दिमिर पुतीन हे दिग्गजही या यादीमध्ये आहेत.
मागच्या वर्षी टाईमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश झाला होता. यंदाही जगात मोदींचा प्रभाव कायम असल्याचं टाईमचं म्हणणं आहे. इंटरनेटवरच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वांमध्येही टाईमनं यावर्षी मोदींना स्थान दिलं आहे.