नवी दिल्ली : त्याचं वय आहे 51 वर्षं... पण एखाद्या तरुणालाही लाजवेल असा पराक्रम त्यानं आपल्या नावावर केलाय. 7 हजार मीटरपेक्षा जास्त ऊंचीच्या कड्यावरून त्यानं आसमंतात स्वतःला झोकून दिलं... हिमालयातल्या लहरी वातावरणाशी तब्बल 3 आठवडे लढा देऊन त्यांनी हे साहस करून दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महाशयांचं नाव आहे वेलेरी रोझोव... रशियन असलेल्या रोझोव यांना अचाट साहसाची लहानपणापासून आवड... वयाच्या 51 व्या वर्षीही त्यांची ही आवड कायम आहे... त्याचाच पाठपुरावा करत रोझोव हिमालयात आले... त्यांना हिमालयातल्या एखाद्या उंच कड्यावरून बेस जंपिंग करायचं होतं. त्यासाठी ते पोहोचले जगातल्या सहाव्या क्रमांकाच्या उंच कड्यापाशी संपला.


चो ओयू... हिमालयातल्या या पहाडाची उंची आहे तब्बल 7 हजार 700 मीटर... त्यानंतर सुरू झाली ती उंच उडीची तयारी... तब्बल 21 दिवस या उडीसाठी झगडत होते... वेगानं वाहणारे वारे आणि भरमसाठ बर्फ यामुळे त्यांना अनेक प्रयत्न सोडून द्यावे लागले... त्यामुळे आपली ही मोहीम फसते की काय? अशी भीती त्यांना वाटत होती... अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं. 


रशियन भाषेमध्ये एक... दोन... तीन... असे आकडे मोजून त्यांनी हिमालयाच्या थंड आसमंतात स्वतःला झोकून दिलं. त्यांच्या या बेस जंपिंगचा थरार त्यांच्या सूटवर बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपला गेलाय. तब्बल 90 सेकंद ते हवेत होते. कानात थंडगार वारा शीळ वाजवत असतानाच जमीन अगदी जवळ आल्यावर त्यांनी पॅराशूट उघडलं आणि सहकाऱ्यांनी आधीच निश्चित केलेल्या ठिकाणावर परफेक्ट लँडिंग केलं.


यापूर्वी रोझोव यांनी 2013 साली एव्हरेस्ट रांगांमधल्या चांगस्ते या 7 हजार 220 मीटर उंचीच्या कड्यावरून उडी मारली होती. आपला हा विक्रम त्यांनी स्वतःच मोडलाय...  अर्थात, या विक्रमाची नोंद झाली नसली तरी त्यामुळे त्याचं महत्त्व कमी होतं असं थोडंच आहे.