मुंबई : ज्या दिवशी प्रीती राठी ऍसिड हल्लाप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्याचदिवशी एका अॅसिड हल्ला पीडित मुलीनं आपल्या रॅम्पवॉकनं जगाची मनं जिंकली... जणू काही तिनं अनेकांना जगण्याची नवी उमेदच दिलीय. 


तिचं धैर्य... तिची जिद्द... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी आहे रेश्मा कुरैशी... जिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. मात्र हीच रेश्मा त्यानंतर खचली नाही तर आणखी खंबीर बनलीय. या जगातील आणि जीवनातील अनंत अडचणींना जणू तिनं रॅम्पवॉक करत पायदळी तुडवलंय.


तिचा रॅम्पवॉक थोडा खास आणि तितकाच बोलका ठरला. हा रॅम्प वॉक म्हणजे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधम पुरुषी प्रवृत्तीच्या सणसणीत कानाखाली आहे. हा रॅम्प वॉक आहे म्हणजे चपराक आहे त्यांना जे पीडितेवर झालेल्या अन्यायानंतर तिला हिणवतात...


जगातील प्रतिष्ठित आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी रेश्माला निमंत्रण आलं होतं.. जेव्हा क्रिम रंगाच्या गाऊनमध्ये रॅम्पवर रेश्मा अवतरली तेव्हा चोहीबाजूनं टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. सौंदर्य म्हणजे फक्त चांगलं दिसणं एवढ्या पुरतं मर्यादित नसतं असा संदेश देत रेश्मानं उपस्थितांची मनं जिंकली.


 


मेहुण्यानंच घडवून आणला अॅसिड हल्ला 


उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये 2014 साली मेहुण्यानं मित्रांच्या मदतीने 17 वर्षीय रेश्मावर ऍसिड हल्ला केला. या हल्ल्यात रेश्माच्या चेहऱ्याचं नुकसान झालं. मात्र त्यानंतरही ती खचली नाही आणि मोठ्या हिंमतीनं आज जगात वावरतेय. त्याच दरम्यान 'मेक लव नॉट स्कार्स' संस्थेच्या संस्थापिका रिया शर्मा यांच्याशी तिची भेट झाली. रेश्मासारख्या अनेक पीडितांना सावरण्याचं काम ही संस्था करते. पुढं याच संस्थेच्या ऑनलाईन अभियानाचा रेश्मा एक चेहरा बनली... तिच्या व्हिडीओला जगभरातून बरीच लोकप्रियता मिळाली.. त्यामुळंच न्यूयॉर्क फॅशन वीकचं निमंत्रण आलं.


अॅसिड हल्ला पीडितांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असतो. मात्र न्यूयॉर्क फॅशन वीकच्या निमित्ताने रेश्माभोवती माध्यमांचा गराडा होता. सारं जग आपल्यासोबत असल्याचं पाहून रेश्माही भारावली.. मात्र त्याचवेळी तिनं समाजाकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्यात. रेश्मानं सौदर्याची नवी व्याख्या जगापुढं आणत अॅसिड हल्ला पीडितच नाही तर तमाम तरुणींना जगण्याची नवी प्रेरणा दिलीय.