काबूल : रविवारी पाकिस्तानातील लाहोर शहरात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटानंतर सोमवारी सकाळी अफगाणिस्तानची राजधानी काबूल रॉकेट हल्ल्यांनी हादरली. काबूल येथे असणाऱ्या अफगाणीस्तानच्या संसदेच्या इमारतीवर सोमवारी सकाळी तीन रॉकेटचा मारा करण्यात आला. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


सोमवारी सकाळी वरिष्ठ सुरक्षा अधिकारी संसदेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संसदेकडे जात होते. सुदैवाने आत्तापर्यंत तरी कोणी जखमी झाल्याची बातमी आलेली नाही. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हा संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या 'वोलेसी जिगरा'च्या सदस्यांची बैठक सुरू होती. पण, तरीही कोणतीही जीवित हानी झाली नाही.


विशेष म्हणजे २०१५ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या इमारतीचे उद्घाटन केले होते. भारत सरकारने 'लोकशाहीचे प्रतीक' असणाऱ्या या इमारतीची बांधणी केली आहे. लोकशाहीविरोधी संघटनांनी या इमारतीवर हल्ला करणे हेसुद्धा प्रतिकात्मक आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा हल्ला गंभीर बाब आहे.