अंकारा : तुर्कस्तानमध्ये करण्यात आललेल्या लष्करी उठावाचा, अवघ्या काही तासांतच बीमोड केला गेला. नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने उठावाचा फज्जा उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती परदेश दौ-यावर गेले असताना, तुर्कस्तानी लष्कराच्या काही अधिका-यांनी उठाव करत, रणगाडे रस्त्यावर उतरवले होते. पण लष्कराच्या या बंडाला चोख उत्तर देण्याकरिता नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे लष्करी उठावातली हवाच निघून गेली. 


राष्ट्रपतींची सुटी रद्द


उठावाचं वृत्त समजताच, राष्ट्रपती तातडीनं सुटी सोडून तातडीनं इस्तंबूलला परतले. लष्करानं राजधानी अंकारा आणि इस्तंबूल या दोन्ही शहरांना लक्ष्य करत, तुफान गोळीबार केला. तर संसदेवरही हल्ला केला गेला. त्यात पोलिसांसह, नागरिक असे एकंदर १६१ जण मृत्यू पावले. तर लष्करी उठाव करण्या-या ३००० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


बंडखोर जवानांनी शरणागती


दरम्यान तुर्कस्तानच्या पोलिसांनी या उठावाचा सामना केला. मात्र लष्कराचं बंड फसल्याने परिस्थिती वेळीच आटोक्यात आली. तर काही बंडखोर जवानांनी शरणागती पत्करत शस्त्रास्त्रे पोलिसांच्या हवाली केली. दरम्यान राष्ट्रपतींनी नव्या लष्करप्रमुखांची नेमणूक केली आहे.


भारतीयांनी तुर्कस्तानमध्ये जाऊ नये!


तुर्कस्तानमधलं वातावरण निवळत नाही तोपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानमध्ये जाऊ नये असं आवाहन, भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. तर तुर्कस्तानमधल्या भारतीयांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं आणि शक्यतो घरातच रहावं, असंही आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केले आहे. तसंच तुर्कस्तानमधल्या भारतीयांशी संपर्क साधण्याकरता, परराष्ट्र मंत्रालयानं हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले आहेत.