शिकागो : अमेरिकेतल्या युनायटेड एअरलाईनने एका प्रवाशाला फरफटत बाहेर काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्यानं प्रवाशा बाहेर काढावं लागलं असा एअर लाईनचा दावा आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी संध्याकाळी शिकागोहून केंट्कीला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला. त्यात प्रवासी संख्या जास्त झाली. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या प्रवास करावा, अशी विनंती एअर लाईनने केली. जे प्रवासी खाली उतरतील त्यांना हॉटेल मुक्कामासाठी 400 डॉलर्स आणि नुकसान भरपाईचे 800 डॉलर देण्यास कंपनी तयार होती. पण कंपनीच्या आवाहनाला कुणीही प्रतिसाद दिला नाही. 


अखेर कंपनीनं संगणकाच्या मदतीनं बाहेर काढण्याच्या प्रवाशांची यादी काढली. त्यात व्हिडिओत दिसणाऱ्या प्रवाशाचं नावं होतं. मी डॉक्टर आहे, उद्या केंटूकीमध्ये काही रुग्ण माझी वाट बघत आहेत. त्यामुळे मला प्रवास करू द्यावा, असं प्रवाशांनं सांगितलं. पण एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनी त्याची विनंती धुडकावून त्याला फरफटत बाहेर काढलं. 



अन्य प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर टाकलाय. काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात खासदार रवींद्र गायकवाड यांना करण्यात आलेल्या हवाईबंदीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओला भारताच्या दृष्टीनंही वेगळं महत्व प्राप्त झाले आहे.