इस्लामाबाद : उरी हल्ल्यानंतर 10 दिवसानंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मोठा खुलासा केला. पहिल्यांदा सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी युएनमध्ये भारतानं पाकिस्तानला लक्ष्य केलं, तसंच पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर भारतानं बहिष्कार टाकल्यानं ही परिषदच रद्द करण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्याच्या प्रयत्नात भारताला यश आल्यामुळे पाकिस्तानमधील माध्यमं पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर भडकली आहेत. भारत आणि काश्मीरबाबतची शरीफ यांची निती अपयशी ठरल्याचा ठपका पाकिस्तानी माध्यमांनी ठेवला आहे.


एप्रिलमध्ये होणार युद्ध?


भारतानं युद्ध न करण्याचा निर्णय घेतला असला तरी एप्रिलमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध होऊ शकतं, या दिवसांमध्ये भारत युद्धासाठीची सामुग्री गोळा करेल असा दावा पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूननं केला आहे. थंडीचे दिवस सुरु होत असल्यामुळे आता युद्ध करण्यासाठी समस्या येतील, असं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे.


अमेरिकेप्रमाणेच भारतही लेझर उपकरणांचा उपयोग करून पाकिस्तानच्या शस्त्रांचं नुकसान करू शकतो, ज्यामुळे युद्धात या शस्त्रांचा उपयोग होत नाही, असं वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्यूननं दिलं आहे.