नवी दिल्ली : ऑक्सफर्ड शब्दकोशाने जगाभरातील देशांच्या चलनांच्या नावाचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना विविध देशांच्या चलनांना त्यांची नावे कशी मिळाली याची माहिती मिळाली. तुम्हाला माहितीये का या चलनांच्या नावांमागील रंजक कहाणी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपया 
संस्कृत शब्द 'रुप्या' ज्याचा अर्थ चांदी असा होतो यावरुन रुपया हा शब्द आला आहे. भारत, पाकिस्तान तसेच इंडोनेशिया देशांचे चलन रुपया या नावानेच ओळखले जाते. 


डॉलर 
जर्मनी भाषेतील 'जोआकिमस्थालर' या शब्दातून 'डॉलर' हा शब्द जन्मला आहे. 'जोआकिमची खाण' असा त्या शब्दाचा अर्थ आहे. या ठिकाणी चांदीच्या खाणी होत्या. जोआकिमच्या खाणीतून मिळवलेल्या खाणीतील चांदीतून नाणी तयार केली जात असत. पुढे त्यांना 'थालर' म्हटले जाऊ लागले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन 'डॉलर' हा शब्द जन्माला आला. 
आज जगभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, न्यूझीलंड, कॅनडा आणि सिंगापूर या प्रमुख देशांच्या चलनाचे नाव डॉलर आहे. 


पेसो
पेसो या शब्दाचा स्पॅनिश भाषेत शब्दशः अर्थ आहे 'वजन' 


लिरा 
इटालियन आणि टर्की यांचे मूळ चलन असलेले 'लिरा' हे नाव 'लिब्रा' या लॅटिन भाषेतील शब्दावरुन आले. या शब्दाचा अर्थ आहे 'एक पौंड' (वजन) 


मार्क 
युरो हे चलन उपयोगात आणण्याआधी जर्मनीचे चलन असणारे मार्क आणि फिनलंडचे चलन असणारे मर्क्का यांचा अर्थ 'वजन मोजण्याचे एक एकक' याच्याशी संबंधित होता. 


रियाल 
लॅटिन शब्द 'रिगलीस' ज्याचा अर्थ 'रॉयल' (राजेशाही) असा आहे या शब्दातून 'रियाल' शब्दाची उत्पत्ती झाली आहे. ओमान, इराण, कतार, सौदी अरेबिया आणि या येमन या देशांमध्ये रियाल हे चलन वापरले जाते. 


रँड 
दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटर्सरँड या सोन्याच्या खाणी असलेल्या ठिकाणांवरुन 'रँड' हे चलन आले आहे. 


युआन, येन आणि कोरियन वोन
चिनी भाषेतील अक्षर "圓" ज्याचा अर्थ गोल किंवा गोल नाणं असा आहे यावरुन चीनचे चलन युआन, जपानचे चलन येन आणि कोरियाचे चलन वोन यांची नावे आली आहेत. 


दिनार 
जॉर्डन, अल्जेरिया, सर्बिया आणि कुवेत या देशांचे चलन दिनार आहे. प्राचीन काळी रोमन साम्राज्यात वापरल्या जाणाऱ्या 'दिनारिअस' या नाण्याच्या नावावरुन हा शब्द आला आहे. 


पौंड 
ब्रिटनचे चलन असलेले पौंड हा शब्द लॅटिन भाषेतील 'पौंडस' या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ 'वजन' असा होतो. इजिप्त, लेबनन, दक्षिण सुदान, सुदान आणि सिरीया ही राष्ट्रे आपापल्या चलनांना पौंड म्हणतात. 


रुबल
रशिया आणि बेलारुस यांचे रुबल या चलनाचे नाव चांदी मोजण्याचे एकक असणाऱ्या 'रुबल'वरुन आले आहे.