मेलबर्न : 'सरप्राईज... मी अजून जिवंत आहे' असं म्हणत आपल्याच अंत्यसंस्काराला उपस्थित झालेल्या महिलेनं आपल्या पतीला जोरदार धक्का दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या हत्येसाठी तिच्या पतीनंच सुपारी दिली होती हे तिला समजलं होतं... पण, सुदैवानं ती वाचली. मेलबर्नमध्ये राहणाऱ्या नोएला रुकोंडो हिची ही कहाणी...


नोएलाचा आणि तिचा पती बोलेंगा कलाला आणि यांची भेट २००४ साली झाली होती. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी विवाह केला. नोएला ही आठ मुलांची आई आहे. त्यातील सर्वात लहान तीन मुलं नोएला-कलाला या जोडप्याची आहेत.


अपहरण आणि सुटका


२०१५ साली आपल्या सावत्र आईच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या नोएलाचं काही अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केलं होतं. पण, नंतर मात्र या व्यक्तींना आपण महिला - मुलांची हत्या करत नाहीत, असं सांगत तिला सोडून दिलं. यावेळी, त्यांनी या महिलेला अपहरणाचा डाव कुणी आखला होता यामागचंही सत्य सांगितलं... आणि नोएलाच्या पायाखालची जमिनच सरकली. 


पतीला धक्का 


तिच्या पतीनंच नोएलाला ठार मारण्याची सुपारी दिली होती. अपहरणकर्त्यांनी सोडून दिल्यानंतर कशीबशी नोएला पुन्हा मेलबर्नला पोहचली. 


यावेळी, तिच्या पतीनं आपल्या पत्नीचं एका अपघातात निधन झाल्याचं सांगत तिच्या अंत्यसंस्काराचा विधी आयोजित केला होता... आणि एखाद्या सिनेमातील प्रसंग घडावा तशी नोएला यावेळीच तिथं उपस्थित झाली. यामुळे तिच्या पतीला मात्र जोरदार धक्का बसला. 


आपल्या पत्नीनं आपल्याला सोडून दुसऱ्या कुणासोबत जाऊ नये, अशी त्याला भीती वाटत होती. त्यामुळे, आपली भीती संपवण्यासाठी त्यानं आपल्या पत्नीची सुपारी दिल्याचं कबूल केलं.