नवी दिल्ली : १५ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करा आणि उरलेली सहा दिवसांची शिक्षा भोगा, असे आदेश अभिनेता राजपाल यादवला न्यायालयानं दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं राजपालला तिहाड जेलमध्ये आत्मसमर्पण करायला सांगतिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्यामुळे २०१३ साली ही शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्यानं ३ ते ६ डिसेंबर २०१३ असे चार दिवस जेलमध्ये घालवले होते. यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याच्या शिक्षेचं निलंबन केलं होतं.


आता मात्र न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती दीपा शर्मा यांनी डिसेंबर २०१३ ची शिक्षा कायम ठेवली आहे. राजपाल यादव यांना त्यांच्या वागणुकीबाबत स्पष्टीकरण द्यायला सांगितलं, पण यानंतरही ते खोट्यावर कायम राहिेले असं मत न्यायालयानं मांडलं आहे. 


या प्रकरणामध्ये वारंवार प्रतिज्ञापत्राचं उल्लंघन झालं आहे. या प्रकरणी त्यांना बोलवण्यात आलं आणि कारवाई का करु नये असं विचारण्यात आलं, पण त्यांनी खोटी आणि टाळाटाळ करणारी उत्तरं दिली, यामध्ये खोट्या प्रतिज्ञापत्राचाही समावेश आहे, असं न्यायालयानं म्हंटलं आहे. 


दिल्लीमधले व्यापारी एमजी अग्रवाल यांनी राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला ५ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. हे कर्ज फेडता न आल्यामुळे अग्रवाल यांनी केस केली होती. २०१० मध्ये चित्रपट बनवण्यासाठी त्यानं हे कर्ज घेतलं होतं.