मुंबई : एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या व्हिडिओमध्ये सचिन आणि लता दीदींची अश्लिल भाषेमध्ये मस्करी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेची प्रसिद्ध टीव्ही सीरिज असलेल्या गेम ऑफ थ्रॉन्समधल्या जॉन स्नोवरून ही टीका करण्यात आली आहे. जॉन स्नो मेला, तुम्हीही मेलं पाहिजे, असं या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरबाबतही अश्लाघ्य वक्तव्य या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहेत. 


या अश्लिल व्हिडिओवर सोशल नेटवर्किंग साईटवरही जोरदार टीका होत आहे. या दोन्ही भारतरत्नांवर अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं अयोग्य असल्याचा सूर सोशल नेटवर्किंगवर उमटत आहे. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर, रितेश देशमुख आणि सेलिना जेटली यांनीही या व्हिडिओचा निषेध केला आहे. 



मला नऊ वेळा कॉमेडी अभिनयासाठी पुरस्कार मिळाला आहे, पण हा व्हिडिओ म्हणजे कॉमेडी नाही, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. 


तर हा व्हिडिओ पाहून मला धक्का बसला, दुसऱ्याचा अपमान करणं यामध्ये काहीच फनी नाही, असं रितेश देशमुख म्हणाला आहे. 



हा व्हिडिओ पाहून मी हैराण झाली आहे, मला अजिबात हसायला आलं नाही, त्यांनी लगेच लता मंगेशकरांची माफी मागितली पाहिजे, असं सेलिना जेटली म्हणाली आहे.