मुंबई : 'बालिकावधू' या कार्यक्रमातून 'आनंदी'ची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या प्रत्युषा बॅनर्जी हिनं या जगाचा निरोप घेतलाय... धक्कादायक म्हणजे, प्रत्युषानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारून आपलं जीवन संपवलंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सकाळी प्रत्युषानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर प्रत्युषाला अंधेरी कोकिलाबेन अंबानी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. इथं तिला मृत घोषित करण्यात आलं. प्रत्युषा केवळ २४ वर्षांची होती. प्रत्युषाची मैत्रिण काम्या पंजाबी हिनं या वृत्ताला दुजोरा दिलाय. 


मूळची झारखंडची असलेल्या प्रत्युषानं  १७ व्या वर्षी छोट्या पडद्यावर पाऊल टाकलं होतं.


का केली प्रत्युषानं आत्महत्या?


आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कटकटींना कंटाळून प्रत्युषानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. प्रत्युषा गेल्या काही महिन्यांपासून राहुल राज सिंग याच्यासोबत संबंधात होती... हे दोघं जण लवकरच विवाहबंधनातही अडकणार होते. परंतु, आपापसांतील मतभेद टोकाला गेल्यानं प्रत्युषानं निराशेच्या भरात तिनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. 


प्रत्युषा 'बालिकावधू' या कार्यक्रमातून घराघरात पोहचली होती. त्यानंतर तिनं 'बिग बॉस सीझन ७'मध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर ती नुकतीच 'ससुराल सिमर का' या कार्यक्रमातही दिसली होती. 


पोलिसाविरुद्ध तक्रार केली होती दाखल


जानेवारी महिन्यात प्रत्युषानं एका पोलिसाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. आपल्या घरात घुसून आपला विनयभंग केल्याचं तिनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.