मुंबई : अभिनेता ओम पुरी यांच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. 6 जानेवारीला अभिनेता ओम पुरी यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कुपर हॉस्पिटलने ओम पुरींचा मृत्य़ू अनैसर्गिक असल्याचा शवविच्छेदन अहवाल दिल्याने मृत्यूचं गूढ आणखीन वाढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओम पुरी यांच्या शरीरात अल्कोहलचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूचे नेमके कारण सांगणे कठीण असल्याचे कुपर हॉस्पिटलने मुंबई पोलीसांना सांगितलंय.


तसंच ओम पुरी यांचा मोबाईल फोन त्यांच्या पत्नीकडे सापडला असून, तो फॉरमॅट मारल्याचे पोलीस सुत्रांनी माहिती दिलीये. पोलीस आता तज्ञांच्या साह्याने त्या फोनचा बॅकअप घेण्याचा प्रयत्न करतायेत. या प्रकरणी ओमपुरींच्या नातेवाईकांची मुंबई पोलिस कसून चौकशी करत आहेत.


काय आहे पोस्टमॉर्टेम अहवालात?


ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, त्यांच्या डोक्यावर चार सेंटीमीटर लांब आणि दीड इंच खोल जखमेचे निशाण होते. कॉलर बोन आणि डाव्या हातावरही काही जखमेचे निशाण आढळलेत.


ओम पुरी शुक्रवारी आपल्या घरात मृतावस्थेत आढळले होते. अनेकांना त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला यावर विश्वास बसत नव्हता. पोस्टमॉर्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरी ज्या इमारतीत राहत होते तिथला व्हिजिटर्स रजिस्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी ताब्यात घेतलेत. मृत्यूपूर्वी पुरी कुणाकुणाला भेटले होते याबद्दल पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.