मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे 1983चा वर्ल्ड कप. कपील देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं. भारताच्या या सुवर्ण कामगिरीचा थरार आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानची बहिण अलविरा आणि तिचा नवरा अतुल अग्निहोत्री या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर कबीर खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करेल. एक था टायगर, बजरंगी भाईजान, ट्यूबलाईट या तीन चित्रपटानंतर कबीर आणि सलमानचा हा चौथा चित्रपट असेल.


हा चित्रपट करताना कपिल देव आणि 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूंचंही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. ट्यूबलाईट चित्रपाटचं शूटिंग संपल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल असं बोललं जात आहे. या विश्वविजेत्या टीममधले खेळाडू म्हणून कोणत्या अभिनेत्यांना घ्यायचं तेही लवकरच निश्चित होणार आहे.


या चित्रपटात सलमान खान कपिल देवची भूमिका साकारणार का याबाबत मात्र उत्सुकता आहे. याआधी एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता. पण अजहर या इम्रान हाशमीच्या चित्रपटानं मात्र निराशा केली होती. सचिन तेंडुलकरचा बायोपिकही लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे क्रिकेटवर चित्रपट येण्याच्या ट्रेंडला सुरुवात झाल्याचं दिसत आहे.