चला हवा येऊ द्यामध्ये इरफानची जादू
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे.
मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच वाहू लागलीये. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलीवूड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान बॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा समावेश होणार आहे.
आपल्या आगामी ‘मदारी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता इरफान खान थुकरटवाडीमध्ये येणार आहे. नुकतंच इरफानच्या या भागाचं चित्रीकरण झालं असून येत्या सोमवारी म्हणजेच १८ जुलैला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून हा भाग प्रसारित होणार आहे.
आपल्या संवादफेकीच्या खास शैलीमुळे लोकप्रिय झालेला आणि अभिनयसंपन्न अभिनेता अशी ओळख इरफान खानची आहे. ‘हासिल’, ‘मकबुल’, ‘पिकू’, ‘पानसिंग तोमर’, ‘लंचबॉक्स’, ‘तलवार’सारख्या वेगळ्या धाटणीच्या हिदी चित्रपटांपासून ‘लाइफ ऑफ पाय’, ‘स्पायडर मॅन’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ सारख्या हॉलिवड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप इरफानने सोडली आहे.
इरफान खानचा चित्रपट म्हटलं की काही तरी वेगळं बघायला मिळणार हे प्रेक्षकांना माहित असतं त्यामुळे तेही त्याच्या चित्रपटाची वाट बघतात. आता इरफानचा ‘मदारी’ हा नवा चित्रपट येतोय ज्याचं दिग्दर्शन आपला मराठमोळा लय भारी दिग्दर्शक निशिकांत कामतने केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने इरफान थुकरटवाडीत आला त्याच्या सोबतीला चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेले तुषार दळवी आणि उदय टिकेकर हे मराठमोळे अभिनेतेही होते.
थुकरटवाडीकरांचा ‘बिल्लू’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’
आपल्या गावात आलेल्या मान्यवर पाहुण्यांच्या एखाद्या चित्रपटावर आधारित स्वतःची वेगळी कलाकृती सादर करणे ही थुकरटवाडीची जणू परंपराच. याही भागामध्ये इरफान खान यांच्या ‘बिल्लू’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’ या दोन गाजलेल्या चित्रपटांवरून त्यांनी आपलाच चित्रपट तयार केला ज्याचा इरफाननेही मनसोक्त हसून आनंद लुटला.
पोस्टमन काकांनी केलं हळवं
एका बाजूला आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा हा मंच आपल्या सामाजिक जाणिवा जागृत ठेवून प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो. आजवर अनेक सामाजिक मुद्दे आपल्या पद्धतीने मांडणा-या या मंचावर येणारे पोस्टमन काकाच्या पत्रांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. याही भागात पोस्टमन काका एक पत्र घेऊन आले होते जे एका माकडाने लिहिलं होतं. मदारी आपल्या तालावर माकडाला नाचवतो आणि त्यातून लोकांचं मनोरंजन होतं. पण आज परिस्थिती अशी आहे की माणूसच व्यवस्थेच्या हातचं माकड बनला आहे आणि ही व्यवस्था त्याला नाचवत आहे. याच आशयाचं हे पत्र ऐकून इरफान आणि उपस्थित सर्वच मंडळी भावुक झाली. इरफानने हे पत्र ऐकून पोस्टमन काकांना आणि पत्र पाठवणा-या त्या अज्ञात माकडाला सलाम केला.