`क्वीन` कंगना - `मूव्हीमाफिया` करण यांच्यातला वाद विकोपाला...
बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत आणि वाद हे जणू समीकरणचं झालंय. हिमाचल प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या या `धाकड गर्ल`ने आता तर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरुन दिग्दर्शक करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. करण आणि कंगनाचा हा वाद विकोपाला गेला असून करणने तर कंगनाला बॉलिवूड सोडण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत आणि वाद हे जणू समीकरणचं झालंय. हिमाचल प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या या 'धाकड गर्ल'ने आता तर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरुन दिग्दर्शक करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. करण आणि कंगनाचा हा वाद विकोपाला गेला असून करणने तर कंगनाला बॉलिवूड सोडण्याचा सल्ला दिला आहे.
बॉलिवूडची क्वीन या न त्या कारणांनी कायम चर्चेत असते... कधी ह्रतिक रोशनसोबत मतभेद तर कधी एक्स बॉयफ्रेन्ड अध्यन सुमनसोबत फाईट... अनेकदा सेलिब्रेटींमधील शीतयुद्ध तर ऐकायला मिळतात, तर कधी कधी अशा प्रकारचे वाद उघडपणे पाहायला मिळतात. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि फिल्ममेकर करण जोहर आणि ‘क्वीन’ कंगना रानौत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
'मूव्हिमाफिया करण...'
'कॉफी विथ करण'मध्ये 'रंगून'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावलेल्या कंगनानं करण जोहरच्या कार्य पद्धतीवरच सडकून टीका केली होती. त्याच्या सिनेमात तो बाहेरच्या कलाकारांना कधीच संधी देत नाही असं उघडपणे तिनं म्हटलं होतं. करण त्याच्या सिनेमात केवळ त्याच्या जवळच्या लोकांनाच किंवा स्टार पुत्रांनाच संधी देतो. मी एखादा चित्रपट बनविला तर करणला त्यात ‘मूव्हीमाफिया’ची भूमिका देईन, असं कंगनानं यावेळी म्हटलं होतं.
करणचा कंगनाला फुकटचा सल्ला...
कंगनाची ही टीका करण जोहरला आता चांगलीच झोंबली आहे. कंगनाच्या तोंडावर नाही तर आता तिच्या पाठीमागून करणने कंगनावर पलटवार केलाय. 'कंगनानं आता हे अबला नारीचं सोंग सोडावं... कंगनाला अन्यायाला बळी पडल्याचं भांडवल करताना पाहून मी आता कंटाळलोय... तिला जर इतकाच त्रास होत असेल, तर तिने बॉलिवूड सोडून निघून जावं...' असा फुकटचा सल्ला करणनं कंगनाला दिलाय.
कंगनाचं प्रत्यूत्तर
यावर कंगना रानौतनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. 'करणला वशिलेबाजीचा अर्थ मी सांगू शकत नाही... मला काम न देण्याचा त्याचा निर्णय ही कलाकार म्हणून माझी थट्टा आहे... त्याची स्मरणशक्तीही काहीशी कमजोर दिसते... 'उंगली' या सिनेमात आम्ही एकत्र काम केलं होतं, मात्र आमचं न पटल्यानं पुढे सिनेमे केले नाहीत... राहिली गोष्ट इंडस्ट्री सोडण्याची तर मी माझ्या मेहनतीनं या इंडस्ट्रीत आलेय... त्यामुळे करणला मला इंडस्ट्री सोडून जाण्यासाठी सांगण्याचा काहीही हक्क नाही'.
आता, हा वाद कुठेवर जाऊन पोहचेल, हे येणारा काळच सांगेल...