`म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली`
काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे.
मुंबई : काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे. या दोघांमध्ये झालेल्या भांडणावर खुद्द करण जोहरनंच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘द अनसूटेबल बॉय’या करण जोहरच्या आगामी पुस्तकात या सगळ्या वादावर खुलासा करण्यात आला आहे.
ए दिल है मुश्किल हा करण जोहरचा सिनेमा आणि शिवाय हा अजय देवगनचा सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाले. यावेळी स्वयंघोषीत चित्रपट समिक्षक कमाल खानला करण जोहरनं शिवायच्या विरुद्ध बोलण्यासाठी 25 लाख रुपये दिल्याचा आरोप झाला होता.
या आरोपांच्या चौकशीची मागणी अजय देवगननं केली होती. यावेळी नवऱ्याच्या समर्थनासाठी काजोलही मैदानात उतरली होती आणि या प्रकरणामुळे मी हैराण असल्याचं ट्विट काजोलनं केलं होतं.
काजोलनं माझ्याबद्दल केलेलं ते ट्विट शेवटचं होतं, असं करण म्हणाला आहे. तसंच माझ्यावर झालेले सगळे आरोप निराधार आहेत. यामुळे मला खूप त्रास आणि दु:ख झाल्याचा खुलासा करणनं त्याच्या पुस्तकात केला आहे.
कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान या करण जोहरच्या चित्रपटांमध्ये काजोल प्रमुख भूमिकेत होती. काजोल ही माझ्यासाठी नेहमीच लकी असल्याचंही करण म्हणाला आहे.