डॉक्टर गुलाटी, चंदू चायवाला, नानीचाही `कपिल`च्या कार्यक्रमाला दांडी...
सुनिल ग्रोवर आणि कपिल शर्मामध्ये झालेल्या वादानंतर चंदन आणि अली अझगर हे दोन सहकलाकारही कपिलवर नाराज असल्याचं दिसतंय.
मुंबई : सुनिल ग्रोवर आणि कपिल शर्मामध्ये झालेल्या वादानंतर चंदन आणि अली अझगर हे दोन सहकलाकारही कपिलवर नाराज असल्याचं दिसतंय. त्याचा परिणाम 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमावरही दिसून येतोय.
कार्यक्रमाच्या नवीन एपिसोडच्या शुटींगला हे तिघेही उपस्थित न राहल्याने त्यांच्याशिवाय हे शूटिंग करावं लागलं. शूटिंगसाठी किकू शर्मा म्हणजेच 'बंपर' आणि नवज्योत सिंग सिद्धू मात्र उपस्थित होते.
या दोघांमध्ये झालेल्या वादाचा परिणाम थेट कपिलच्या शोवर होतोय. या सर्व कलाकारांच्या एकत्र कामामुळेच हा शो इतक्या प्रसिद्धीला पोहचू शकला. मात्र तेच कलाकार नाराज असल्याने प्रेक्षकांना हसवणार कोण? हा प्रश्न चॅनल आणि निर्मात्यांसमोर आहे.
कपिलने तर या वादानंतर सुनिलची ट्विटरवरून माफीसुद्धा मागितली. सुनिलचा राग मात्र इतका अनावर झालाय की, 'कपिलच्या या वागण्यानंतर त्याच्या शोमध्ये आपण अजिबात परत येणार नाही', असं त्याने चॅनलला सांगूनही टाकलंय.
त्यांच्यामधला हा वाद आता कोण मिटवणार? आणि हे कलाकार शोमध्ये पुन्हा दिसणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.