मुंबई : सध्याच्या लग्नसराईत आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडलीय. झहीर खानला क्लीन बोल्ड केलंय मराठमोळ्या सागरिका घाटगेनं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागरिकाला तिच्या 'प्रेमाची गोष्ट' सापडलीय... आणि या गोष्टीत क्लीन बोल्ड झालाय झहीर खान... हे क्युट कपल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात होतं. एका मित्राच्या पार्टीत या दोघांची ओळख झाली... पहिल्या भेटीतच झहीर खानची विकेट पडली होती... त्यानंतर दोघांनीही बऱ्याच पार्ट्या आणि कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली... युवराज सिंग आणि हेजल किचच्या लग्नामध्ये हे दोघंही एकत्र आले. त्याच वेळी या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळाले होते. आता अखेर त्यांचा साखरपुडा झाल्याचा फोटो झहीर खाननंच इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.


सागरिका ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातली... पण तिचं बालपण आणि शिक्षण राजस्थानातल्या अजमेरमध्ये झालं... 'चक दे इंडिया' सिनेमातून सागरिकानं बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली... या सिनेमातली प्रीती सबरवाल ही तिची भूमिका गाजली... योगायोगानं या सिनेमातही तिचं एका क्रिकेटरशीच अफेअर होतं... आणि आता रियल लाईफमध्येही तिला जोडीदार म्हणून क्रिकेटरच आवडला... 


'चक दे इंडिया'नंतर 'रश' या हिंदी सिनेमात सागरिकानं काम केलं... पण प्रेक्षकांच्या लक्षात राहिली ती प्रीती सबरवालच...


त्यानंतर सागरिका दिसली ती थेट मराठमोळ्या सिनेमात... 'प्रेमाची गोष्ट'मध्ये अतुल कुलकर्णीसारख्या तगड्या अभिनेत्याबरोबर तिनं भूमिका केली... या सिनेमात सागरिकाचे मराठी उच्चार थोडे खटकले असले तरी सागरिकाचा स्क्रीनवरचा वावर सुंदर होता.


सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हिंदी, एक मराठी आणि एक पंजाबी सिनेमा सागरिकाच्या नावावर आहे. पण, मॉडेलिंगमधलं करिअर आणि पेज थ्री पार्टीतला  वावर यामुळे सागरिका सतत ग्लॅमरमध्ये आणि चर्चेत राहिली... झहीर खान आणि सागरिकानं प्रेमात पडल्यावर काही महिन्यांतच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आता या दोघांच्याही आयुष्यात नवी इनिंग सुरू होतेय.