दोन हजार कोटींच्या ड्रग्स रॅकेटमध्ये ममता कुलकर्णीचं नाव
ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा हात असल्याचं, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.
मुंबई : ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा हात असल्याचं, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे. तसे पुरावेच सापडल्याचं आयुक्तांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं. ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी याचाही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांना रेड कॉर्नर नोटीस बजवाण्याकरता इंटरपोलला विनंती करणार असल्याचंही आयुक्त म्हणाले. सध्या ममता आणि विकी केनियात असल्याची माहिती त्यांनी दिली. ड्रग्ज रॅकेटमध्ये 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
8 जानेवारीला केनियात आणि 1 एप्रिलला मोरक्कोमध्ये ड्रग्ज माफियांची बैठक झाली होती. या बैठकीला ममता कुलकर्णी हजर राहिली होती. ठाणे पोलिसांनी सोलापूरमधून दोन हजार कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. त्यानंतर सुरु केलेल्या तपासातून या गोष्टी पुढे आल्या.