कपिल देशपांडे, मुंबई : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीचा फटका बॉलिवूडबरोबरचं मराठी फिल्म इंडस्ट्रीलाही चांगलाच बसलाय. 'रॉक ऑन-२' सारख्या बिग बजेट सिनेमाला झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानानंतर अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिमॉनिटायझेशन अर्थातच नोट बंदीचा फटका मनोरंजनविश्वालाही बसला आहे यात अनेक सिनेमांचा समावेश आहे. फरहान अखतर, अर्जुन रामपाल आणि श्रध्दा कपूर स्टारर 'रॉक ऑन-२' या सिनेमाला याचा सगळ्यात जास्त फटका बसला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर केवळ ८ कोटींचाच व्यवसाय करता आला. ६५ कोटींचे बजेट असलेल्या 'रॉक ऑन-२' च्या निर्मात्यांना हे आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. त्यामुळे यातून बोध घेत आता अनेक निर्मात्यांनी आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकललीय.


शर्मन जोशी, सना खान स्टारर 'वजह तुम हो' हा सिनेमा २ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. हिंदीप्रमाणे मराठीत ही अनेक सिनेमांनी आपल्या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.


स्वप्निल जोशी आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला 'फुगे' हा सिनेमा आता नव्या वर्षातच प्रदर्शित होणार आहे तर झी स्टुडिओज निर्मित अभिनेता अंकुश चौधरी स्टारर आणि सतिश राजवाडे दिग्दर्शित 'ती सध्या काय करते?' या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील पुढे गेलीय. त्यामुळे नोटबंदीमुळे बॉलिवूड तसेच मराठी फिल्म इंडस्ट्रीकडूनही जपून पावले उचलली जातायत.


तर दुसरीकडे काही सिनेमांनी नोटाबंदीच्या काळातही चांगली कमाई केलीय. जॉन आणि सोनाक्षी स्टारर 'फोर्स २' या सिनेमाने या सगळ्या गदारोळातही दोन आठवड्यात तब्बल ४५ कोटींची कमाई केलीय. तर शाहरुख खान आणि आलिया भटच्या 'डियर जिंदगी'नेही पहिल्या चार दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमाविलाय.


आगामी काळातही बॉक्स ऑफिसवर अनेक बडे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे नोटबंदीचा फटका या सिनेमांना बसतो की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.