मुंबई : कमीत कमी वेळेत मोठा आशय मांडणाऱ्या लघुपटानी लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक लघुपटकारांनी त्यांच्या लघुपटाद्वारे लोकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, जाणिवा, कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यासारखे विषय मनोरंजन्तामकरित्या लोकांसमोर मांडले आहेत. अशा लघुपट निर्मात्यांसाठी युनिव्हर्सल मराठीने 'माय मुंबई शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०१६' या महोत्सवाचे आयोजन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महोत्सवाचे हे पाचवं वर्ष आहे. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर २०१६ दरम्यान रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये पार पडणार आहे. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुपटांचे स्क्रीनिंग, मान्यवरांचे चर्चासत्र, प्रश्नोत्तरं आणि विविध विषयांवरील कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्यात. 


आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणाऱ्या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय (इंटरनॅशनल), अॅनिमेशनपट, मोबाईल शूट फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म) संगीतपट (म्युझिक व्हिडिओ) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीकरिता तुम्ही तुमची शॉर्टफिल्म पाठवू शकता.


सन्मानचिन्ह आणि बक्षीस...


विनामूल्य ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर २०१६ आहे तर डीव्हीडी (DVDs) पाठविण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर आहे. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक 'बेस्ट शॉर्टफिल्म' विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याना 'वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड' (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. विजेत्यांना रोख रखमेसहित सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.


प्रवेशासाठी...


या महोत्सवासाठी सर्वांनाच विनामूल्य प्रवेश असेल. पण त्यासाठी या महोत्सवाच्या वेबसाईटवर जाऊन आधीच नाव नोंद करणे आवश्यक आहे. अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. 


अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९८३३०७५७०६ या नंबरवर आणि www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर संपर्क साधावा. फेसबुकवरहि 'युनिव्हर्सल मराठी'च्या पेजला तुम्ही भेट देवू शकता.