सिनेमाच्या एका तिकीटाची किंमत तब्बल एक लाख रुपये
सिनेमांचे चाहते आपल्या आवडत्या सिनेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यासाठी एखाद्या तिकीटासाठी लाख रुपये द्यावे लागले तरी त्यांना तितकेसे काही वाटत नाही. असेच काहीसे घडलेय हैदराबादमध्ये.
मुंबई : सिनेमांचे चाहते आपल्या आवडत्या सिनेमासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यासाठी एखाद्या तिकीटासाठी लाख रुपये द्यावे लागले तरी त्यांना तितकेसे काही वाटत नाही. असेच काहीसे घडलेय हैदराबादमध्ये.
आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की एखाद्या प्रसिद्ध चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने खरेदी कऱण्यासाठी लोकांनी हजारो रुपये खर्च केलेत. मात्र तामिळ सिनेमातील मेगास्टार बालाकृष्ण यांच्या गौतमीपुत्र शतकर्णी या सिनेमासाठी त्यांच्या एका फॅनने तब्बल एका तिकीटासाठी लाख रुपये मोजलेत.
गुंटूरमध्ये रेस्टॉरंट चालवणाऱ्या या फॅनचे नाव आहे गोपीचंद ईन्नमूरी. वर्षभरापासून ते बालाकृष्ण यांच्या सिनेमाची वाट पाहत होते. यासाठी त्यांनी पैसे वाचवून ठेवले होते. मात्र हे केवळ बालाकृष्ण यांचा चित्रपट पाहण्यासाठी केले नव्हते.
तर साऊथचा हा मेगास्टार कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी बालाकृष्ण इंडो-अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल चालवतात आणि संस्थेच्या लोकांना अशी आशा होती की बालाकृष्ण यांच्या सिनेमाची तिकीटे ५०० आणि २००० रुपयांना विकल्यास आजारी लोकांना मदत होऊ शकेल.
यावेळी बालकृष्ण यांच्या फॅनने तब्बल एक लाख रुपयांचा चेक दिला आणि तिकीट विकत घेतले. सर्वात महागडे तिकीट खरेदी केल्याचा ईन्नमूरी यांना अभिमान आहे. आता केवळ बालाकृष्ण यांच्यासह सेल्फी काढण्याची त्यांची इच्छा आहे.