मुंबई : आजकाल यशाची शिखरं पादाक्रांत करणारी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने सुद्धा एके काळी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट तिचे माजी संयोजक प्रकाश जाजू यांनी केला आहे. प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या ट्वीट्समध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकाश जाजू आणि प्रियांका चोप्रा यांच्यात २००४ साली वाद झाला होता. तिने त्यांच्यासोबतचा करारही यानंतर रद्द केला होता. आता इतक्या वर्षांनी जाजू हे सर्व खुलासे का करतायत, असा प्रश्न प्रियांकाचे चाहते सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. त्यांना लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा चर्चेत यायचे आहे, असा आरोप केला जात आहे. 


'प्रियांका आता फार कठोर दिसत असली तरी ती तिच्या स्ट्रगलच्या काळात कमजोर मनाची होती. तिने दोन-तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण, तेव्हा मी तिला थांबवलं,' असं ट्वीट त्यांनी केलं आहे. 


प्रियांका आणि प्रकाश यांच्यात झालेल्या वादानंतर तिने त्यांच्यासोबतचा करार रद्द केला. यानंतर प्रकाश यांनी कोर्टात धाव घेत तिच्यावर फौजदारी खटला दाखल केला होता. प्रियांकाने छोटा शकीलमार्फत आपल्याला धमकावल्याचा आरोपही प्रकाश यांनी केला होता. २००८ साली प्रियांकाच्या वडिलांनी प्रकाशविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासाठी प्रकाशने ६७ दिवस तुरुंगाची हवासुद्धा खाल्ली होती. 


तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकाश आणि प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंड असीम मर्चंट यांनी प्रकाशच्या जीवनावर आधारित '६७ डेज' हा चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली होती. पण, चित्रपटाची प्रसिद्धी तिच्या आयुष्याभोवती फिरत असल्याने तिने कायदेशीर नोटीस बजावली होती. नंतर हा चित्रपट बासनात गुंडाळला गेला.