मुंबई : पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कंदीलचा भाऊ वसीमला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर वसीमनं कंदीलची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. कंदीलची हत्या केल्याबद्दल मला दु:ख नाही, असं वसीम म्हणाला आहे. कंदीलनं कुटुंबाची बदनामी केल्यामुळे तिची हत्या केल्याचं वसीम म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंदीलच्या फेसबूक पोस्ट आणि वादग्रस्त व्हिडिओमुळे कुटुंबाला त्रास होत होता, त्यामुळे कंदीलला औषध देऊन बेशुद्ध केलं आणि तिची गळा दाबून हत्या केली, अशी कबुली तिच्या भावानं दिली आहे. 


मॉडेलिंग आणि फेसबूक सोडण्यासाठी कंदीलला तिच्याच कुटुंबाकडून धमकी देण्यात आली होती, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तीन आठवड्यांपूर्वी कंदीलनं पाकिस्तानी गृहमंत्री आणि सुरक्षा यंत्रणांना पत्र लिहून सुरक्षा देण्याची मागणी केली होती. माझ्या जीवाला धोका आहे, असं या पत्रात कंदीलनं लिहीलं होतं, अशी बातमी पाकिस्तानी वृतपत्र डॉननं दिली आहे. 


कंदील बलोच तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत होती. सोशल नेटवर्किंगवर कंदीलचे हजारो फॉलोअर्स होते. माजी क्रिकेटर इमरान खानबरोबर लग्न करायची इच्छा वर्तवली होती. काही दिवसांपूर्वीच कंदीलनं मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती कवीबरोबर वादग्रस्त फोटो शेअर केला होता. 


कंदीलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहरुख खानबद्दलही वक्तव्य केलं होतं, तसंच विराट कोहलीसाठीही तिनं लव्ह मेसेज पाठवला होता. विराटनं माझ्यासाठी अनुष्काला सोडावं असं कंदील म्हणाली होती. सलमान खानचा रियलिटी शो बिग बॉस 10 मध्येही कंदील येणार होती.